Wednesday, 4 January 2012

श्री शिवाजी महाराजांची आरती

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या अंगचे सर्व गुण आणि सर्व शक्ती केवळ देशभक्तीच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मातृभूमीच्या चरणी वाहिल्या. सावरकर सर्वप्रथम देशभक्त होते आणि नंतर महाकवी, समाजसुधारक, लिपीसुधारक, रणझुंजार नेते होते. सावरकरांचे हे जाज्वल्य राष्ट्रप्रेम त्यांच्या बालपणापासूनच स्पष्ट होत होते. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात आर्य संघ या नावाच्या भोजन संघामध्ये प्रत्येक आठवड्यास म्हटली जावी म्हणून सावरकरांनी श्री शिवाजी महाराजांची आरती लिहिली.

जयदेव जयदेव जय जय शिवराया। या या अनन्यशरणा आर्या ताराया।।आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला। आला आला सावध हो शिवभूपाला।। सद्गदिता भूमाता दे तुज हाकेला। करुणारव भेदुनि तव हृदय न कां गेला?।। श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी। दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी। ती पूता भूमाता म्लेंच्छांही छळलता। तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?।। त्रस्त अम्ही, दीन अम्ही शरण तुला आलो। परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो। साधु परित्राणाया दुष्कृति नाशाया। भगवन भगवद्गीता सार्थ कराया।। ऐकुनिया आर्यांचा धावा गहिंवरला। करुणोक्तें स्वर्गी श्रीशिवनृप गहिंवरला। देशास्तव शिवनेरी घेई देहाला। देशास्तव रायगडी ठेवी देहाला। देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला। बोला तश्रीमत्शिवनृप की जय बोला।।

No comments:

Post a Comment