Thursday, 22 March 2012

एकदा ती बसमध्ये अचानक दिसली


एकदा ती बसमध्ये अचानक दिसली
मित्राने ओळख करून दिली
मी विचारले , कोणत्या शाळेतली गं तू?
तुझ्याच शाळेतली , बघितलं नाही कधी मला तू?

काय सांगणार आता हिला
एकदा वर्गातल्या मुलीला हाच प्रश्न विचारला
चिडली होती जरा, "तू मुलींकडे कधी बघतच नाहीस"
काय करणार, तेव्हढी हिंमतच झाली नाही

हा, तर ती बस मधली मुलगी
आताही माझ्याच कॉलेजात होती
सुंदर ती होती, वाणीही मंजुळ होती
राज की बात, मला ती आवडली होती.

मग काय माझा बसस्टॉपला जायचा टाइम बदलला
वाट पाहण्यात एक-दोन बसही चुकू लागल्या
दूरून दिसताच ती, गोड गुदगुल्या होऊ लागल्या
देवकृपा, असा योगायोग वारंवार घडू लागला

बघता बघता दोन वर्षे अशीच सरली
तरीही स्टॉपपुढे माझी मजल नाही गेली
कॉलेज संपले, दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या
कोमल हृदयात माझ्या, हाय! , आठवणी मात्र राहिल्या

जेथे बसून मी खूप काही स्वप्ने रंगवली होती
तो स्टॉप आता खाली खाली वाटत होता
गेला उन्हाळा , गेला पावसाळा , हिवाळा ही गेला
तिच्या दर्शनासाठी हा मन्या पार तरसून गेला

पुन्हा योगायोग, त्याच बसस्टॉपवर ती अचानक दिसली
हसलो मी, सुखावलो मी आणि पुन्हा तिच गुदगुली
नजरा नजर होताच मोठ्या खुशीत मी विचारले
काय! खूप दिवसांनी भेट झाली ना आपली!!

तिच्या त्या प्रश्नार्थक नजरा, गोंधळलेला चेहरा
काय झालं ! असा कोणता बॉम्बं मी टाकला
विचार केला तिने, त्याच मंजुळ वाणीत ती वदली
"माफी, चेहरा ओळखीचा वाटतो, पण नाव काय आपलं?"

क्षणात कोसळलो आकाशातून खाली, आई गं!!
चांदणे चमकले, थोडी भोवळही आली
लाचार उभा मी, माझ्यावरच ही वेळ का आली
नाव सांगितलं मी, "बघ आठवतं का काही"

हसली जरा ती, कदाचित चूक तिला कळली
पण लगेचच पुढच्या बसने "टाटा" म्हणून निघून गेली
बसच्या घंटीने माझी सारी स्वप्ने मोडली
अशी ती मुलगी माझी फजिती करून गेली

साधा भोळा मी, बिचारा, तुटलो होतो जरा मी
पण सावरलोय मी, ठरवलं आहे पक्कं मी
कानाला खडा, कोणासाठी अधीर इतका होणार नाही मी
झालोच तर, बसस्टॉपवर वाट मुळीच पाहणार नाही मी.....

No comments:

Post a Comment